Ad will apear here
Next
या व्याकुळ संध्यासमयी...


५९व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीचा २९ नोव्हेंबर २०१९ रोजी समारोप झाला. त्या दिवशी सादर झालेल्या ‘या व्याकुळ संध्यासमयी’ या नाटकाचा हा परिचय...
...........
दिवेलागणीची वेळ, मेघा वेदपाठक - प्रसिद्ध समाजसेविका - हॉलमधल्या आरामखुर्चीत बसली आहे. ‘संसार है इक नदिया’ या गीताचे बोल ऐकू येत आहेत. त्या बोलांबरोबर मेघाचं मन मागे जातं - खूप खूप मागे. विचारात हरवलेल्या स्थितीत ती खिडकीपाशी जाऊन उभी राहते आणि अभावितपणे हाक मारते - श्रीऽऽ!

श्री!.... श्रीकांत गडकरी....! मेघा वेदपाठकचा पहिला जीवनसाथी. अवघ्या सहा महिन्यांचा संसार, नंतर घटस्फोट! दोघांचे रस्ते वेगवेगळे. मेघा समाजकार्यात रमली, श्री कविता आणि साहित्यात. मेघाचं समाजकार्य ‘एनजीओ’च्या माणसांबरोबर, श्रीची कविता साहित्यरसिकांबरोबर. मेघा काम करत असलेल्या संघटनेशी खूप माणसांचा संबंध. त्यातल्याच वेदपाठक नावाच्या कार्यकर्त्यासोबत तिचं लग्नही होतं. एक मुलगी होते त्यांना - श्वेता तिचं नाव. 



वेदपाठकचा एका अपघातात मृत्यू होतो. मग मायलेकी दोघींचंच कुटुंब. तिकडे श्रीकांतचंही एकट्याचं आयुष्य सुरू आहे. मेघाला खूप उशिरा कळलं - श्रीबरोबर राहणारा त्याचा मुलगा शेखर हा दत्तकपुत्र असल्याचं. मधल्या काळात बरीच वर्षं संपर्कच नाही ना! कसा होणार? एकमेकांचा सहवासच नको झालेला!

मेघा आणि श्री.....! श्रीच्या कवितेनं त्यांना एकत्र आणलं. मग भेटीगाठी. प्रेमाचे धागे जुळतात. रोज सायंकाळी भेटण्याचं संकेतस्थळ पक्कं होतं. तिच्या भेटीसाठी आतुरलेला श्री संकेतस्थळी जाऊन बसतो. तिची वाट पाहत. तिचं उशिरानं येणं. संघटनेचं काम आटोपून येतं असते ती; पण त्या प्रतीक्षेतही श्रीला एक अनामिक आनंद मिळत असतो. अधूनमधून फिरायलाही जातात ती. पाण्यात पाय सोडून श्री बसलाय, ती मोकळ्या हवेत, गिरक्या घेत निसर्गाचा सहवास अनुभवतेय.....! छान चाललेलं असतं सगळं. 



पण तिला होणारा उशीर ठरलेलाच. रोजचाच. इतका की ‘वाट बघून भेटण्याची हुरहुर संपली की ती येणार’ असं श्रीला वाटू लागतं. लग्नाआधीचेच हे दिवस. त्याला असं वाटतं, ही भविष्यातल्या घटनांची चाहूल तर नव्हे? एकदा तर ती बोलून जाते - आपले रस्ते वेगळे, आपण लग्नाच्या बंधनात न अडकणं बरं! 

तरीही होतं. अगदी थोड्या दिवसांतच मागचा अंक नव्याने सुरू होतो. त्यानं सायंकाळी फिरायला जाण्याचं ठरवावं, तिनं उशिरा यावं. त्यानं मित्रमंडळींसोबत पिकनिकला जायचं नक्की करावं, तिनं संघटनेच्या सभेचं कारण पुढे करत नकार द्यावा. रोज रोज संध्याकाळी फिरण्यात, आइस्क्रीम खाण्यात तिला रस नाही. अन् इतरांची घरं सावरताना आपला संसार मोडतोय याची श्रीला चिंता वाटतेय. त्याची कविता निखळ आनंद देणारी, तिची समाजसेवा मनाला समाधान देणारी, निःस्वार्थ; पण समाधान देणाऱ्या निःस्वार्थ समाजसेवेचाही एक कैफ असतो, एक धुंदी असते. त्यात मेघा हरवलीय. त्यातच संघटनेच्या कामानिमित्त वरचेवर घरी येणारा वेदपाठक.... त्याचं तर नाव नको श्रीला. शेवटी व्हायचं तेच...... घटस्फोट! 



पंचवीस वर्षांपूर्वीचा तो पट मेघा आणि श्री या दोघांच्याही डोळ्यांपुढून वरचेवर सरकत असतो. अनेकवार येणाऱ्या ‘फ्लॅशबॅक’मधून. श्रीचा मुलगा शेखर नि मेघाची मुलगी श्वेता एकाच बँकेत नोकरीला. त्यांचे प्रेमसंबंध जुळतात. त्यांना एकमेकाच्या घरची परिस्थिती - म्हणजे त्या दोघांच्या अलग होण्यापुरतीच - ठाऊक होते. त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मेघा नि श्रीला होत जाते. त्यांची संमतीही असते; पण मेघा नि श्री इतक्या वर्षांनी पुन्हा जवळ येत आहेत हेदेखील त्या मुलांना जाणवतं. आपलं नातं काय हा प्रश्न त्यांच्यासमोर आता उभा राहतो. इतकी वर्षं परस्परांमधून दूर राहिलेली ती दोघं - एकत्र आली पाहिजेत असं दोघांनाही मनोमन वाटत असतं. 



शेखर हा श्रीचा दत्तकपुत्र. तो सात वर्षांचा असताना त्याच्या आजारी आईला श्रीनं आधार दिला. दोन वर्षांनी ती जग सोडून गेली. श्रीनं शेखरला दत्तक घेतलं होतं. संसार न थाटता सच्चेपणे राहून आपल्याला आधार देणाऱ्या श्रीबद्दल शेखरच्या मनात असणारा नितांत आदर नि सुस्वरूप श्वेताचं ताजं टवटवीत प्रेम यांच्या चिमटीत सापडलेला शेखर श्वेतापासून दूर जाण्याचा निर्णय घेतो. विचारान्ती श्वेताही तसाच निर्णय घेते. घरी आलेल्या श्रीचं स्वागत करून आपला निर्णय त्यांना सांगते. 

श्री आणि मेघानं समजावल्यावर शेखर नि श्वेता यांची नव्या जीवनातलं पाहिलं पाऊल टाकण्याची तयारी होते. मेघाच्या आरामखुर्चीमागे तिचे हात हातात घेऊन उभा राहिलेला श्रीकांत - नव्हे, त्याचा आभासाच तो...! 

मेघा ‘फ्लॅशबॅक’मधून बाहेर येते. पडदा पडतो. 

आभार सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळातर्फे सादर करण्यात आलेल्या ‘या व्याकुळ संध्यासमयी’ या नाटकाचं हे कथानक. मनोहर सुर्वे यांनी त्याचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. या नाटकाबरोबरच एकोणसाठाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीचा समारोप झाला. 

- राजेंद्रप्रसाद मसुरकर
मोबाइल : ९९६०२ ४५६०१

(५९व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीत झालेल्या प्राथमिक फेरीतील सर्व नाटकांचा परिचय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZOOCG
Similar Posts
रेस्ट हाउस : न विझणाऱ्या सूडाग्नीचं रहस्यमय कथानक ५९व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीतील आठवे नाटक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सादर करण्यात आले. ‘रेस्ट हाउस’ नावाचे हे नाटक नाणीज येथील महाकाली रंगविहार या संस्थेने सादर केले होते. त्याचा हा परिचय...
अननोन फेस - चेहरा बदलून वेदना लपविण्याच्या प्रयत्नांचं कलात्मक सादरीकरण ५९व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या तिसऱ्या दिवशी (२० नोव्हेंबर २०१९) सादर झालेल्या ‘अननोन फेस’ या नाटकाचा हा परिचय...
रिमोट कंट्रोल : पहिल्या क्रमांकाच्या ईर्ष्येने होणारी मुलाची फरफट रत्नागिरीत सुरू असलेल्या ५९व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत प्राथमिक फेरीच्या पाचव्या दिवशी (२२ नोव्हेंबर २०१९) सादर झालेल्या ‘रिमोट कंट्रोल’ या नाटकाचा परिचय...
धुआँ : ‘सभ्य’ जगाच्या सीमारेषा प्रभावीपणे दाखवणारं नाटक ५९व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीतील दहावे नाटक २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सादर करण्यात आले. ‘धुआँ’ नावाचे हे नाटक गणेशगुळे इथल्या ‘अजिंक्यतारा थिएटर्स’ने सादर केले होते. त्याचा हा परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language